✍️ संदिप बारटक्के
दौंड — अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बारामती जिल्हातर्फे राष्ट्रीय विद्यार्थी दिवस आणि अभाविप स्थापना दिनानिमित्त ९ ते १४ जुलैदरम्यान विद्यार्थी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कुरकुंभ येथील फिरंगाई माता महाविद्यालयात ‘मिशन साहसी’ अंतर्गत विद्यार्थिनी संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थिनींना आजच्या काळात उद्भवणाऱ्या विविध आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली स्वसंरक्षणाची तंत्रे, सतर्कता आणि आत्मविश्वास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.
जय बजरंग कराटे अकॅडमीचे संस्थापक अजय गायकवाड यांनी विद्यार्थिनींना प्रभावी स्वसंरक्षण प्रशिक्षण देत विविध प्रसंगांमध्ये स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना व अभाविपची भूमिका तन्मयी कोंढाळकर यांनी मांडली.
यावेळी अभाविप बारामती जिल्हा संयोजक ओंकार तावरे, जिल्हा सहसंयोजक तन्मयी कोंढाळकर, जिल्हा एसएफडी संयोजक मल्हार काकडे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून आत्मविश्वास वाढण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























