✍️ संदिप बारटक्के
दौंड : आई-वडिलांनी दिलेले संस्कार हेच आयुष्यभराची खरी शिदोरी असते. ते केवळ आई-वडील आपल्या सोबत असताना नव्हे, तर त्यांच्या पश्चातही कृतीतून जपले गेले पाहिजेत, या भावनेतून प्रशांत शामराव पवार व पवार परिवाराने स्वर्गीय आई नंदा शामराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
७ जुलै हा स्वर्गीय नंदा पवार यांचा वाढदिवस. यावर्षी त्यांच्या देवाज्ञेला नऊ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या शिकवणीचा, उपदेशाचा आणि त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वारसा जपण्याच्या उद्देशाने पवार परिवाराने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले.
यावेळी स्व. लाजवंती ग्यारेला हायस्कूल येथील निवासी वसतिगृहातील सुमारे २५० विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सुश्रुषा नर्सिंग इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वाचनालयात व्यावसायिक अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. याशिवाय पासलकर वस्ती येथील विशेष शाळेतील विद्यार्थ्यांसाठी किराणा साहित्याचे वाटप करून त्यांच्या गरजांना हातभार लावण्यात आला.
यावेळी प्रशांत शामराव पवार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, आई-वडिलांचे संस्कार हेच आपल्या आयुष्याचे खरे भांडवल असते. ते असताना त्यांचा सन्मान करावा आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारांनुसार समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, हीच त्यांना खरी आदरांजली आहे. त्यांच्या आठवणींना जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजसेवा.
पवार परिवाराच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, स्मृतिदिनाचे औचित्य साधून समाजासाठी विधायक कार्य करण्याचा त्यांचा हा आदर्श अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























