✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय महोत्सव महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
रांगोळी, पारंपरिक वेशभूषा, पाककला, नृत्य, गायन, नाट्य, मेहंदी यांसह विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ दौंड नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध झाले होते. यावेळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभालाही महिलांची मोठी उपस्थिती लाभली होती.
महिला सक्षमीकरणासाठी दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा यांच्याकडून सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सव काळात २०१ महिलांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण, बचत गट निर्मितीस प्रोत्साहन आणि आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेविका उज्ज्वला परकाळे, प्रणिता शिंदे-जठार, स्वाती सावंत, राणी लष्करे, सरोज भैनवाल, ज्योती आवटी, केतकी परकाळे, मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट, रोटरी क्लब ऑफ दौंड, आयोजन टीम आणि सहकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ, आत्मविश्वासाला बळ आणि नारीशक्तीला सन्मान देणारा हा महोत्सव दौंडमधील महिलांसाठी प्रेरणादायी ठरला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















