✍️अख्तर काझी
दौंड: शहर व शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक वाढलेली आहे. प्रशासनाकडून या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतेही नियोजन नाही असे चित्र आहे तसेच या संदर्भात प्रभावी यंत्रणा राबविण्यात प्रशासन कमी पडत असल्याने येथील सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरात वाहनांची संख्या वाढलेली असतानाही आवश्यकतेप्रमाणे पार्किंग व्यवस्था नसल्याने येथील समस्यांमध्ये वाढत होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वाढत्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी दौंड शहर व तालुका मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मराठा महासंघाच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून, शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने पार्क केली जात असल्याने विद्यार्थी, व्यापारी, नागरीक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघात झाले आहेत आणि भविष्यातही होण्याची शक्यता वाढत आहे.
सध्या साखर कारखाने सुरू झाल्यामुळे शहर व परिसरात तसेच तालुक्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची व ट्रॉलींची वर्दळ वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुक कोंडी होणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.
दौंड शहरातील शाळा, महाविद्यालय, दवाखाने, विविध कार्यालय, बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे.
शहरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावावी. तसेच वाहनांसाठी निश्चित पार्किंग व्यवस्था करून तिची काटेकोर अंमलबजावणी करावी.
रस्त्यावरील चेंबर्स समपातळीत आणणे शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेले उंच किंवा खोल चेंबर्स अपघातास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे सर्व सदरचे चेंबर्स रस्त्याच्या समपातळीत आणून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
वाहतुकीचे नियम न पाळणारे, चुकीच्या पद्धतीने वाहन चालविणारे, रस्त्यावर अडथळा निर्माण करणारे तसेच नियमबाह्य पार्किंग करणारे वाहनचालक यांना नियत्रिंत करण्यात यावे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना रिफ्लेक्टर बंधनकारक करणे, साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रॉलींची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. रात्रीच्या वेळी अशा वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या मागील बाजूस तसेच आवश्यक त्या बाजूंना नियमानुसार रिफ्लेक्टर बसविण्याची सक्ती करावी.
नागरिक व वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करुन अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.
मुख्य रस्त्यावरील तसेच मुख्यतः सहकार चौक ते नविन प्रशासकीय इमारत रस्त्यावरील वाहतुकीस कोंडी निर्माण करणारे अडथळे त्वरीत दुर करण्यात यावेत.
दौंड शहरात चोहो बाजूंनी येणारी वाहतुक कमी करण्यासाठी बायपास रस्ते तयार करण्यात यावेत.
वरील सर्व बाबी या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि सुरक्षितेशी संबंधित आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी संयुक्तपणे नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि होणाऱ्या अपघातांना आळा बसावा यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















