✍️अख्तर काझी
दौंड: दौंड तालुक्यातील सोनवडी गावातील रस्ता कामांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी या मागणीसह विविध गंभीर तक्रारीवर आज पर्यंत कोणतीही प्रभावी कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते सचिन काकडे यांनी दौंड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
सचिन काकडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पुणे जिल्हा पालकमंत्री, नगर विकास मंत्री ,पुणे जिल्हाधिकारी, दौंड तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक दौंड यांना याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे सोनवडी येथील आश्रम शाळेमागील रस्ता कामांमध्ये 1 लाख 85 हजार रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, सोनवडी गावातील अर्जुन यादव घर ते सुरेश लोंढे घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामामध्ये 1लाख रुपयांचा आर्थिक अपहार व गैर व्यवहाराची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, ग्रामपंचायत सोनवडी येथील आपले सरकार सेवा केंद्र(CSC ID 156336130017) चा अनधिकृत वापर तथा 50 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार व अपहाराची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, ग्रामपंचायत सोनवडी येथील ग्रामविकास अधिकारी यांच्या सेवा पुस्तकातील 17 दिवसांच्या रजेची नोंद आणि त्याच कालावधीत हालचाल नोंदवही मध्ये ग्रामपंचायतीत उपस्थिती दर्शविण्यात आल्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकार्यास तत्काळ निलंबित करावे व कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या सचिन गायकवाड यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी केलेल्या आहेत तसेच या सर्व प्रकरणांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नाही. संपूर्ण प्रकरणांमध्ये न्याय मिळावा व संबंधित दोषीची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई व्हावी आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जावे या उद्देशाने आमरण उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















