✍️अख्तर काझी
दौंड: शहरातील अहिल्यादेवी होळकर सहकार चौक परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एका 62 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. रज्जाक मदार आत्तार (वय 62,रा. पानसरे वस्ती, दौंड) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी गौसूद्दीन रज्जाक आत्तार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी तेजस कांबळे( पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106(1)281,125(a)125(b),324(4), मोटार वाहन कायदा कलम 184,134,177 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना 11 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7.30 वा. च्या दरम्यान येथील सहकार चौक परिसरातील अंगत वडापाव सेंटर समोर घडली. फिर्यादी यांचे वडील रज्जाक अत्तार हे आपल्या दुचाकीवरून येथील गोल राऊंड रस्त्याने कुरकुंभ मोरी च्या दिशेने जात असताना तेजस कांबळे याने भरधाव दुचाकी चालवीत, रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. व कसलीही मदत न करता तो तेथून पळून गेला. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अपघातानंतर जखमी रजाक आत्तार यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले परंतु उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नातलगांनी दिली.
सध्या शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असून जीवित हानी होत आहे. अल्पवयीन मुले शहरातून बेदरकारपणे, भरधाव वेगाने वाहने दामटत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस तर दारू पिऊन भरधाव वेगाने वाहने दामटणाऱ्यांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री च्या गस्ती वेळी अशा दारू पिऊन वाहने पळविणाऱ्यांवर व दुसऱ्याच्या जीवाला धोका उत्पन्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गतिरोधक बसविण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली आहे, मात्र नगरपालिकेने अद्याप या ठिकाणी गतिरोधक न दिल्याने रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. एखादा मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याआधी नगरपालिकेने या चौकात गतिरोधक बसवावेत अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने फार पूर्वीच करण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















