✍️ अख्तर काझी
दौंड: वीज ग्राहकांचे चालू जुने मीटर बदलून त्या ऐवजी स्मार्ट मीटर बसविणे हे सक्तीचे आहे की ऐच्छिक याविषयी वीज ग्राहक संभ्रमावस्थेत असल्याने त्यांचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी वाद होत आहेत. महावितरण चे कर्मचारी वीज ग्राहकांना कोणतीही पूर्व सूचना न देता जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवीत आहेत असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे आणि त्यामुळेच महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आले असता शहरात सर्वत्रच वादाचे प्रसंग उद्भवत आहेत असे चित्र सध्या दिसत आहे. अशाच एका घटनेत महावितरणच्या महिला विद्युत सहाय्यक आकांक्षा विक्रमराव देवकर यांच्या फिर्यादीवरून भरत बागल (रा. नेने चाळ दौंड) यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता च्या दरम्यान शहरातील नेने चाळ परिसरातील मुरली अपार्टमेंट येथे घडली. महावितरण चे सहाय्यक अभियंता कांदे यांच्या लेखी आदेशाने फिर्यादी महावितरण मधील आपल्या सहकाऱ्यां बरोबर नेने चाळ येथे स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेले होते. मुरली अपार्टमेंटमधील तीन वीज ग्राहकांचे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अपार्टमेंटमधील काही महिला व पुरुष तेथे जमा झाले. आमच्या बिल्डिंगमध्ये स्मार्ट मीटर बसवायचे नाहीत म्हणून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घातला. त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या मोबाईल मध्ये त्यांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. दरम्यान भरत बागल त्या ठिकाणी आले, त्यांनी फिर्यादी ,सहकाऱ्यांशी एकेरी भाषेचा उल्लेख करीत वाद घातला. बागल फिर्यादी यांना म्हणाले की तू व्हिडिओ काढायचा नाही, तू शासनाची नोकर आहेस आणि मी मीटरचा मालक आहे त्याचे पैसे मी भरतो असे म्हणत ते फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले.व फिर्यादी यांच्या हातातील मोबाईल हिसकावु लागले. तसेच त्यांनी फिर्यादी व त्यांच्या बरोबरील सहकाऱ्यांना अपार्टमेंटच्या बाहेर काढले, फिर्यादी यांच्या हातातील स्मार्ट मीटर हिसकावून घेतला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या झालेल्या घटनेनंतर भरत बागल यांच्या विरोधात दौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होत आहे याची माहिती मुरली अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या महिलांना समजली. त्यामुळे या महिला पोलीस स्टेशनला आल्या व आम्हाला सुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली आहे, त्यांच्या विरोधात सुद्धा आम्हाला तक्रार करावयाची आहे असे त्यांनी सांगितले. तेव्हा तुमची सुद्धा तक्रार आम्ही घेतो परंतु त्यासाठी आधी तुमची मेडिकल करावी लागेल, तुम्ही मेडिकल करून या असे उत्तर पोलीस स्टेशनला हजर असणाऱ्या पोलिसांनी दिल्याने या महिला घाबरल्या व तक्रार न देताच आपल्या घरी निघून गेल्या. त्यामुळे फक्त बागल यांच्या विरोधातच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.
सध्या शहरातील सर्वच भागांमध्ये वीज ग्राहकांचे जुने मीटर बदलून त्या ऐवजी स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. परंतु जुन्या मीटरला काहीही झाले नसताना नवीन स्मार्ट मीटर का घ्यायचे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातच स्मार्ट मीटर बसविल्यानंतर येणारे वीज बिल भरमसाठ येते असा ग्राहकांचा आरोप आहे. त्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर नकोच अशी सर्वांचीच भूमिका दिसत आहे. आणि त्यामुळेच स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांचे वाद होत आहेत. स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे आहे की ऐच्छिक हा प्रश्न सर्वात आधी सुटणे आवश्यक आहे. स्मार्ट मीटर सक्तीचे नाही तर ग्राहकांच्या इच्छेचा विषय आहे अशी नागरिकांची धारणा आहे. महावितरणचे कर्मचारी आपल्या बळाचा वापर करीत स्मार्ट मीटर स्वीकारण्याची सक्ती करीत आहेत, कायद्याचा धाक दाखवीत ग्राहकांच्या संमतीविना, महिला कर्मचाऱ्यांना पुढे करीत स्मार्ट मीटर बसविले जात आहेत असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिक व महावितरण मधील हा वाद आणखीनच चिघळत आहे. हा वाद मिटविण्यासाठी येथील व्यापारी महासंघ ,विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्मार्ट मीटरचा विषय सक्तीचा आहे की ऐच्छिक याचा एकदाचा निकाल लावावा अशी समस्त दौंडकरांची मागणी आहे.
स्मार्ट मीटर सक्तीचे आहे हे महावितरण कंपनीने कागदोपत्री सिद्ध करावे ,ग्राहक विरोध करणार नाही व स्मार्ट मीटर ऐच्छिक असेल तर महावितरण ने त्याची सक्ती करू नये अशा प्रतिक्रिया सुद्धा दौंडकर नागरिकांकडून येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















