✍️ संदिप बारटक्के
दौंड : देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या माजी सैनिक, सेवानिवृत्त लष्करी अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने पानसरे हॉस्पिटल अँड आयसीयू, दौंड यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी विशेष आरोग्यसेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
डॉ. सुभाष पानसरे व डॉ. ज्योती पानसरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन दौंड शहरातील स्थायिक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व संरक्षण दलातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हॉस्पिटलच्या लिंगाळी रोड येथील परिसरात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमांतर्गत आर्मी तसेच इतर संरक्षण दलातील जवान, अधिकारी, माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबित कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सल्ला (फ्री कन्सल्टेशन) तसेच विविध लॅबोरेटरी तपासण्यांमध्ये विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे दौंड व परिसरातील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्जेदार आरोग्यसेवा सुलभपणे मिळणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. सुभाष पानसरे यांनी सांगितले की, देशाच्या सीमांचे रक्षण करताना सैनिकांनी केलेल्या त्यागाची आणि सेवाभावाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्याच भावनेतून हा आरोग्यसेवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. “Proud to Serve Those Who Serve the Nation” आणि “Honouring Our Heroes, Caring for Their Families” या भावनेतून हा उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उद्घाटन कार्यक्रमास केशव करंडे, बाळासाहेब जराड, प्रकाश गाडे, विक्रम पवार, ॲड. सौ. व श्री. अशोक मुनोत, आदिनाथ थोरात, प्रतापराव खानविलकर यांच्यासह संरक्षण दलातील इतर सन्माननीय माजी अधिकारी व जवान उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माजी सैनिक, हॉस्पिटलचे डॉक्टर व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उपक्रमाचे स्वागत केले. माजी सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, दौंड परिसरातील अधिकाधिक माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
अधिक माहितीसाठी : डॉ. सुभाष पानसरे – मो. ९८६००११६२५

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















