✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड-पाटस रोडवरील बेटवाडी गावच्या हद्दीत दुचाकीला मागून भरधाव वेगाने धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी Hyundai i20 Asta क्रमांक MH12PZ6838 वरील अज्ञात चालकाविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीस्वार शुभम प्रमोद कदम (वय २९) आणि कुणाल बाळू पंगुडवाले हे दोघे जखमी झाले आहेत.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार क्रमांक ०५९९/२०२६ नुसार हा अपघात १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता मौजे बेटवाडी, ता. दौंड, जि. पुणे येथील दौंड-पाटस रोडवर घडला. शुभम कदम हे कुणाल पंगुडवाले यांच्यासोबत दुचाकी क्रमांक MH42BA8566 या दुचाकीवरून वरवंडच्या दिशेने जात होते.
बेटवाडी हद्दीत त्यांच्या मागून आलेल्या Hyundai i20 Asta कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धडकेनंतर दुचाकीवरील दोघेही रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडले. या अपघातात कुणाल पंगुडवाले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला व ते बेशुद्ध झाल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शुभम कदम यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोन्ही जखमींना उपचारासाठी खवटे हॉस्पिटल, दौंड येथे दाखल केले. कुणाल पंगुडवाले यांच्या डोक्याला, तोंडाला, खांद्याला, दोन्ही हातांना, दोन्ही पायांना तसेच पोटावर दुखापती झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १८४, १३३ आणि १७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास संदेश मखरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दाखल अंमलदार पोलीस हवालदार किरण ढुके आहे.पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























