संदिप बारटक्के
दौंड : सोनवडी ग्रामपंचायतीशी संबंधित विविध विकासकामे, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय नोंदींमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत सोनवडी येथील सचिन मधुकर काकडे यांनी दौंड तहसीलदार कार्यालयासमोर दि. १३ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित तक्रारींवर वारंवार अर्ज व पाठपुरावा करूनही प्रभावी चौकशी किंवा कारवाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काकडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिलेल्या निवेदनात सोनवडी ग्रामपंचायतीशी संबंधित चार प्रमुख प्रकरणांकडे लक्ष वेधले आहे.
सोनवडी येथील आश्रमशाळेमागील रस्त्याच्या कामात १ लाख ८५ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी १ एप्रिल २०२६ रोजी चौकशीची मागणी केली होती. तसेच अर्जुन यादव यांच्या घरापासून सुरेश लोंढे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कामात १ लाख रुपयांचा आर्थिक अपहार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत २८ एप्रिल रोजी तक्रार करण्यात आली होती.
याशिवाय ग्रामपंचायत सोनवडी येथील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (CSC ID १५६३३६१३००१७) च्या कथित अनधिकृत वापराबाबत तसेच ५० लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार व अपहाराचा आरोप करत २२ जून रोजी चौकशी व फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद आहे.
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सेवापुस्तकातील १७ दिवसांच्या रजेची नोंद असतानाच त्याच कालावधीत हालचाल नोंदवहीत ग्रामपंचायतीत उपस्थिती दर्शविल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी २२ जुलै रोजी करण्यात आली होती.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप करत सचिन काकडे यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर व फौजदारी कारवाई करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर संबंधित तक्रारींची तातडीने दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे चौकशीनंतरच आरोपांमधील तथ्य स्पष्ट होणार आहे.
उपोषणादरम्यान आपल्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास प्रशासन जबाबदार राहील, असेही सचिन काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























