वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दौंड येथील संस्कार स्कूलमध्ये (दि.२८) विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्प सादर करून आपली कल्पकता, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दौंड नगरपालिकेचे गटनेते जीवराज पवार, नगरसेवक रोहित पाटील तसेच युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल जगताप हे उपस्थित होते. दौंड नगरपालिकेचे गटनेते जीवराज पवार यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, पाणी शुद्धीकरण, पर्यावरण संरक्षण, रोबोटिक्स तसेच ज्वालामुखीचे मॉडेल यांसारख्या विविध विषयांवर (विज्ञान, भूगोल व इंग्रजी) आकर्षक प्रकल्प सादर केले. प्रत्येक प्रकल्पामागील वैज्ञानिक तत्त्व विद्यार्थ्यांनी उपस्थितांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.
या प्रदर्शनाला शिक्षक, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि संशोधनाची जिज्ञासा वाढण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने काही पालकांनी विविध प्रकारचे स्ट्रीट फूड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते. विशेषतः “क्रिस्पी कॉर्नर” या खाद्य स्टॉलला विद्यार्थ्यांसह पालकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
अशा शैक्षणिक आणि आनंददायी वातावरणात संस्कार स्कूलमधील विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























