वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील समाजमंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा थोडक्यात आढावा घेतला.
त्या म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी आहे. केवळ शिक्षण घेणे पुरेसे नसून समाजहितासाठी संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, बुद्धिमत्तेला चालना मिळते आणि समाजातील जातीभेद, विषमता व गुलामगिरी नष्ट होण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. शोषित व वंचित घटकांसाठी शिक्षण हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्त्री-पुरुष समानतेवर भर देताना त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. स्त्रियांनी शिक्षित होऊन समाजाला योग्य दिशा द्यावी, हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून त्यातून चरित्रनिर्मिती, स्वावलंबन आणि जबाबदार नागरिकत्व घडले पाहिजे, असा दृष्टिकोन त्यांनी मांडला.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला नगरसेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या भागात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि चांगली कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपला पाठिंबा कायम माझ्या पाठीशी राहू द्या,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संपूर्ण अण्णाभाऊ साठे नगरवासीयांचे आभार मानले.
या प्रसंगी आबासाहेब वाघमारे, उत्तमराव सोनवणे, विठ्ठल सोनवणे, उपेश तूपसौंदर्य, सोमनाथ आगलावे, विनायक मोरे, संजय मोरे, सुरेश तुपसौंदर्य, सागर सोनवणे, अमित मोरे, साहिल खंडाळे, अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























