वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड – दौंड शहरात सोमवारी (ता. ५) सकाळी साडेनऊच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दौंड–नगर रस्त्यावर योगराज हॉटेलसमोर उसाने भरलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकवरील मोकळ्या रस्सीमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत शाहिद करीम शेख (वय ३२, रा. ओम शांतीनगर, गजानन सोसायटी, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा भाऊ अकबर करीम शेख व वहिनी नसरीन अकबर शेख हे होंडा अॅक्टिव्हा (MH 42 BQ 4965) वरून शालीमार चौकाकडून गजानन सोसायटीकडे जात असताना, टाटा कंपनीचा उसाने भरलेला ट्रक (MH 12 FZ 7493) भरधाव वेगात व बेदरकारपणे जात होता.
ट्रकवरील उसाची रस्सी योग्य खबरदारी न घेता मोकळी ठेवण्यात आल्याने ती अचानक उडून दुचाकीस्वारांच्या अंगावर पडली. रस्सी गळ्याभोवती आवळल्याने अकबर करीम शेख यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर नसरीन अकबर शेख या गंभीर जखमी झाल्या. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105, 106(1), 281, 125(A), 125(B), 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 177 अन्वये अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बिद्री पुढील तपास करीत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























