✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड नगरपरिषदेच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे उद्यान पुन्हा सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे विकासकाम कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये तसेच शासकीय कामात जाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त मातंग समाज व मातंग समाजातील विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे -पाटील, उपनगराध्यक्ष छाया थोरात तसेच दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
दौंड नगरपरिषदेच्या माध्यमातून तसेच स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बंद असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान पुन्हा सुरू करण्यासाठी विकासकाम हाती घेण्यात आले आहे. या कामाबद्दल मातंग समाज व दौंड शहरातील नागरिकांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले.
मात्र, उद्यानाचे विकासकाम सुरू झाल्यानंतर काही स्वयंघोषित पुढारी व समाजकंटकांकडून या कामात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विविध आंदोलने करण्याचा इशारा देणे, निवेदने देणे तसेच ठेकेदाराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारांमुळे शासकीय व सार्वजनिक हिताच्या विकासकामात अडथळा निर्माण होत असल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
अशा प्रकारे शासकीय कामात विनाकारण अडथळा निर्माण करणाऱ्यांची नगरपरिषद प्रशासनाने गंभीर दखल घेऊन नियमानुसार चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच उद्यानाचे काम सुरळीत, पारदर्शक आणि कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद अधिकारी, संबंधित शासकीय अधिकारी तसेच समाजातील होतकरू युवा व प्रतिनिधींना सहभागी करून ‘समन्वय समिती’ स्थापन करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान हे दौंड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण असून त्याचे विकासकाम लवकरात लवकर पूर्ण करून ते नागरिकांच्या सेवेत खुले करण्यात यावे. या कामासाठी समस्त मातंग समाज व नागरिक नगरपरिषद प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा लहुजी यंग ब्रिगेडचे दौंड अध्यक्ष आकाश तुपसौंदर्य, लहुजी शक्ती सेनेचे दौंड तालुका अध्यक्ष अमित मोरे, लहुजी बटालियन अध्यक्ष हिरण खुडे, लहुजी शक्ती सेनेचे दौंड शहर अध्यक्ष धीरज दिवटे, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष आकाश पवार, अविनाश तुपसौंदर्य, नरेश ससाणे आदी उपस्थित होते.
उद्यानाचे काम सुरू केल्याबद्दल नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. उद्यानाचे विकासकाम कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमानुसार पूर्ण करून ते लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















