संदिप बारटक्के
दौंड : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, ‘हरित दौंड’ या संकल्पनेतून तब्बल २ लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ च्या आवारात वृक्षारोपण करून उत्साहात करण्यात आला.
यावेळी आमदार ॲड. राहुल कुल म्हणाले की, भविष्यातील पिढ्यांना शुद्ध, निरोगी आणि सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी वृक्षारोपण ही केवळ सरकारी योजना न राहता लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून दौंड तालुक्यात २ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल.
या अभियानामुळे दौंड तालुक्यातील हरित क्षेत्रात मोठी वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास तसेच हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास मदत होईल, असा विश्वासही आमदार कुल यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५ च्या समादेशक आरती बनसोडे, उपविभागीय अधिकारी रेवनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटविकास अधिकारी अरुण मरभळ, नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळ व भाजप मित्रपक्षाचे गटनेते योगेश कटारिया, नगरसेवक अथर्व सरनोत, अमोल काळे, निलेश पवार, वसिम शेख, शहानवाज पठाण, सागर जगताप, ज्योती राऊत, वैशाली माशाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























