✍️ अख्तर काझी
दौंड : कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून आवाज देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील विविध पक्ष, सामाजिक संस्था ,शैक्षणिक संस्था आणि संघटनांचे वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले.
जयंती निमित्ताने येथील साठे नगर गावठाण येथे, नट श्रेष्ठ कुमार आहेर यांनी मी सत्यशोधक आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बोलतोय हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. या समाज प्रबोधन पर कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासो पवार यांच्या हस्ते करण्यात आले, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाप्रमुख बी. वाय. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास नागसेन धेंडे, नरेश डाळिंबे आदि मान्यवर उपस्थित होते.
दि. 1 ऑगस्ट रोजी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान येथे अण्णाभाऊंच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात, दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, उपनगराध्यक्षा छाया थोरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरपालिकेतील गटनेते योगेश कटारिया, सोहेल खान, अमित सोनवणे ,नागसेन धेंडे ,सचिन गायकवाड ,नगरसेवक स्वाती सावंत, राणी लष्करे, प्रणिता शिंदे, विकास लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी वीरधवल जगदाळे म्हणाले की, दीड दिवस शाळेत गेलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रभावी कामगार नेते होते. त्यांच्या एका हाके वर लाखो कामगार एकत्र येत होते तसेच ते थोर साहित्यिक सुद्धा mm होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांवर लाखो विद्यार्थी पीएचडी करीत आहेत. त्यांचे साहित्य परदेशातील 27 भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे. त्यांनी कथा, कादंबरी, पोवाडे ,लोकनाट्य सिनेमा या क्षेत्रामध्ये भरीव काम केले. मुंबई महाराष्ट्रातच राहावी म्हणून त्यांनी त्यांच्या पोवाड्यांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी त्यांना कारावास भोगावा लागला. अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अण्णाभाऊंना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा तरुणांनी त्यांचे विचार डोक्यात घेऊन काम करावे हीच खरी अण्णाभाऊंना आदरांजली ठरेल असे विचार विरधवल जगदाळे यांनी व्यक्त केले. लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष आबा वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
सायंकाळच्या सत्रामध्ये नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, गटनेते योगेश कटारिया, नगरसेवक सागर जगताप, स्वाती सावंत, रुपेश जाधव तसेच निलेश सावंत प्रशांत धनवे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या तैल चित्रास अभिवादन करण्यात आले. डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या तैल चित्राची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये बहुसंख्येने समाज बांधव सामील झाले होते. शहरातील प्रमुख चौकांमध्ये येथील विविध पक्ष, संघटनाच्या वतीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. आमदार राहुल कुल तसेच नागरिक हित संरक्षण मंडळ ,भाजपा, आरपीआय, पीआरपी पक्षाचे नगरसेवक तसेच पदाधिकारी यांनी शहरातून निघालेल्या विविध मिरवणुकांना भेट देत अण्णाभाऊंना अभिवादन करीत समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.
जयंती उत्सव यशस्वी करण्याकरिता लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रमेश खुडे, सोमनाथ आगलावे, अनिल कांबळे, नरेश ससाने, सागर लोखंडे ,सागर सोनवणे, विनायक मोरे ,सुरेश तूपसौंदर्य ,संजय मोरे, दत्तू घोडे, उमेश तूपसौंदर्य, दादा तूपसौंदर्य ,अनुप आगलावे ऍड. सुशांत वाघमारे, रवी मोरे यांनी परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























