संदिप बारटक्के
दौंड : पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि परिसर हिरवाईने नटविण्याच्या उद्देशाने भीमथडी शिक्षण संस्थेच्या स्व. किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालय, दौंडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि वनविभाग, दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळवाडी परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत हजारो देशी वृक्षांची रोपे तसेच बियांची लागवड करण्यात आली.
वाढते शहरीकरण, प्रदूषण, हवामानातील बदल आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या मोहिमेत करंज, पिंपळ, जांभूळ, बेल, अशोक यांसह विविध देशी वृक्षांच्या रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. स्थानिक वातावरणाशी सुसंगत असलेल्या देशी वृक्षांच्या लागवडीमुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.
या वृक्षारोपण मोहिमेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. पी. वाघमोडे तसेच दौंड परिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “आज हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी वृक्षलागवड करणे अत्यावश्यक आहे. एक झाड म्हणजे अनेक जीवांचे जीवन आहे. त्यामुळे प्रत्येकाने केवळ वृक्षलागवड न करता लावलेल्या झाडांचे नियमित संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. पी. वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संवर्धनात तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित काळजी घेऊन त्याचे संगोपन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमात प्रा. विकास शेलार, प्रा. अर्जुन चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर तूवर, प्रा. निलेश साखरे, प्रा. विजया कदम, प्रा. अमृता खंडागळे, प्रा. शरद जगताप आदी प्राध्यापकांनी सहभाग घेतला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षलागवड आणि परिसराच्या पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले.
वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी के. जी. कटारिया महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे यांनी विशेष सहकार्य केले. वनविभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
गोपाळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली वृक्षलागवड भविष्यात परिसराच्या पर्यावरणीय विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरण वाचवा” हा संदेश देत या मोहिमेचा समारोप करण्यात आला. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यासच या उपक्रमाचे खरे फलित साध्य होईल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























