वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
भारतीय हवामान विभागाने यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ (El Nino) परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दौंड नगरपरिषद प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे आणि उपनगराध्यक्षा छाया थोरात यांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशांचा संदर्भ देत, ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत शहरातील नागरिकांना अखंड, सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेने युद्धपातळीवर नियोजन करावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनामध्ये संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शहरातील जलस्रोत, जलाशय आणि विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे, सार्वजनिक विहिरी व बोअरवेलची दुरुस्ती आणि देखभाल करणे, तसेच पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी टँकरद्वारे पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
याशिवाय दौंड शहरातील बेकायदेशीर नळजोडण्या शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, पाणीचोरी रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत नियमित तपासण्या कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्य जलवाहिन्या आणि वितरण यंत्रणेमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्यावर भर देण्यात यावी. यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा अपव्यय रोखता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
नगरसेविका स्वाती सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे की, एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर आणि परिणामकारक उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाची वेळेत दखल घेऊन नगरपरिषद प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे आता दौंडकरांचे लक्ष लागले आहे. संभाव्य संकटापूर्वीच उपाययोजना केल्यास दौंड शहराला भविष्यातील पाणीटंचाईच्या फटक्यापासून मोठा दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























