वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
देऊळगाव राजे : इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह व्हिडीओ टाकून दोन जाती–धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी केली आहे.
देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे येथे राहणारे १) खुशीलाल घनशाम सहाणी (वय २१), २) राजेश प्यारेलाल सहाणी (वय ३५) — दोघेही मूळ रा. तेलीयाडीया, पो. तेलपुरखा, जि. सिद्धार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश आणि ३) मीर हसन मोहम्मद मक्सुदमिया अली (वय २८), रा. भगवानपूर, जि. कैमूर, राज्य बिहार — यांनी त्यांच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवरून समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर व्हिडीओ पोस्ट केल्याचे निष्पन्न झाले.
या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच समाजात शांतता अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी वेळीच कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, बारामती यांच्यासमोर हजर केले असता, त्यांनी तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानुसार तिघांची येरवडा कारागृह, पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारे, द्वेष पसरवणारे अथवा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























