वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहरातील श्री स्वामी समर्थ भक्तांच्या सोयीसाठी नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी पुढाकार घेत दौंड ते अक्कलकोट थेट एस.टी. बससेवा सुरु करण्याची मागणी केली आहे.
याबाबत त्यांनी दौंड एस.टी. स्थानकाचे आगारप्रमुख शिवाजी जालिंदर कानडे यांना निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी नमूद केले की, पूर्वी दौंडहून सोलापूरपर्यंत सकाळची रेल्वे सेवा उपलब्ध होती; मात्र कोरोना काळानंतर ती बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या उपलब्ध असलेली पहाटेची मुंबई–चेन्नई रेल्वे सेवा आरक्षित असल्याने ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दौंडहून श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जाणाऱ्या स्वामी भक्तांची संख्या मोठी असून थेट एस.टी. सेवा नसल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी बदल करून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व खर्च वाढत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.
दररोज सकाळी दौंडहून सुटून रात्री परत येणारी थेट एस.टी. सेवा सुरु करावी, तसेच कुरकुंभ, भिगवण, पळसदेव, लोणी देवकर, इंदापूर, टेंभूर्णी, मोडनिंब, मोहोळ, सोलापूर व वळसंग या मार्गे बस चालवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























