✍️ अख्तर काझी
दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी महिलेच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वारकरीत शीर धडापासून वेगळे केले आणि कुठेतरी फेकून दिले आहे. त्यामुळे मयत महिलेचे शिर शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. दौंड पोलिसांनी घटनेच्या बारा तासाच्या आतच दोन आरोपींना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुमन किसन शिंदे(वय 70,रा. आर.बी. 1 दौंड) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी मयत महिलेची मुलगी तृप्ती सचिन हिरवे (रा. रामलिंग रोड ,शिरूर, पुणे) यांनी फिर्याद दिली.
विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट(वय 26,रा. समता नगर, दौंड) व प्रसाद बाबुलाल चव्हाण(रा. आर बी वन, नगर मोरी, दौंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 19 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3.15 वा. च्या सुमारास निदर्शनास आली. आरोपींनी अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने महिलेच्या गळ्यापासून शिरच्छेद करून खून केला असून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शीर वेगळ्या ठिकाणी नेऊन टाकले आहे. दौंड पोलीस स्टेशन तसेच पुणे जिल्हा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वतंत्र तपास पथके तयार करून जलद तपास यंत्रणा राबविली व अवघ्या बारा तासातच आरोपींना जेरबंद केले.
वृद्ध महिलेचा अतिशय क्रूरपणे खून झाला असल्याची माहिती समोर आल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण असून हळहळ ही व्यक्त करण्यात येत आहे. काही स्थानिकांनी सांगितले की रविवार दि. 17 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत सदर महिलेला आम्ही पाहिले परंतु नंतर ती दिसली नाही बुधवारी दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान मयत महिलेच्या खोलीतून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी सदरची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले त्यांनी घरात पाहिले असता त्यांना महिलेचे शिर नसलेले धड आढळून आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या सूचनेप्रमाणे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी ,विनायक सपाटे, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, ज्ञानेश्वर राऊत तसेच पोलीस कर्मचारी आसिफ शेख, सचिन घाडगे, पांडुरंग थोरात ,गुरुनाथ गायकवाड ,सुभाष राऊत, विकास कापरे ,नितीन बोराडे ,धनंजय गाढवे, निखिल जाधव, आमिर शेख ,किरण पांढरे, महेंद्र लोहार, पवन माने ,सोमनाथ चौंडे, निखिल पवार, हजारे ,अक्षय कुंभार ,ओमनाथ तुमकुटे, तांबोळी या पथकाने कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करीत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























