✍️ संदिप बारटक्के
दौंड | श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. अखंड हरिनाम सप्ताह ची सुरुवात व्यंकटेश मल्टीस्टेट बँकेचे मॅनेजर गणेश बारटक्के यांनी विणा पुजन करून सुरुवात केली. विठ्ठल रुक्मिणीला व नामदेव पायरीचा महाअभिषेक सौ व श्री गणेश बावधनकर यांच्या हस्ते करण्यात आले. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. संत श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्त दौंड शहरामध्ये संत नामदेव महाराजांच्या पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, वैष्णव भक्त तसेच समाजबांधव सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सांगता सोहळ्यानिमित्त ह.भ.प. भूषण महाराज महापुरुष यांचे काल्याचे कीर्तन झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी संत नामदेव महाराजांच्या कार्याचा आणि भक्तिमार्गातील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
यावेळी बोलताना ह.भ.प. भूषण महाराज महापुरुष म्हणाले की, “संत नामदेव महाराजांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, तर ते विश्वव्यापी होते. संत नामदेव महाराजांची विठ्ठलावरील सख्य भक्ती आणि त्यांचा देवाशी असलेला जिव्हाळा आजही भक्तांना प्रेरणा देतो.”
बालपणी विठ्ठलाला नैवेद्य दाखवताना घडलेला प्रसिद्ध प्रसंग, विठ्ठलाशी असलेले त्यांचे अतूट नाते आणि नामस्मरणातून भक्तीचा मार्ग त्यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांसमोर उलगडला.
“संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या पायावर संत नामदेव महाराजांनी भक्तीची इमारत उभी केली. गावोगावी जाऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचा विचार आणि भागवत धर्माचा प्रसार केला,” असेही ह.भ.प. भूषण महाराज महापुरुष यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत, नगरसेवक रुपेश राजेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत धनवे उपस्थित होते. समारोपप्रसंगी बोलताना त्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कार्याला अभिवादन केले.
यावेळी सौ. स्वाती सावंत म्हणाल्या की, “साडेसातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत अनेक संतांनी जन्म घेऊन समाजाला भक्ती, समता आणि मानवतेचा मार्ग दाखविला. या संतश्रेष्ठ मालिकेतील एक तेजस्वी रत्न म्हणजे संत शिरोमणी नामदेव महाराज.”
संत नामदेव महाराजांचा जन्म नरसी, हिंगोली येथे झाला असून पंढरपूर हे त्यांच्या भक्तीचे आणि कार्याचे प्रमुख केंद्र राहिले. विठ्ठलावर त्यांचे अपार प्रेम होते. बालपणी विठ्ठलाला दूध-पाण्याचा नैवेद्य दाखविल्याची प्रसिद्ध कथा आजही भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन असलेल्या संत नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर महाराष्ट्राबाहेरही भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचविला. त्यांनी पंजाबपर्यंत प्रवास करून भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या अभंगांपैकी काही रचना शीख धर्माच्या पवित्र ‘गुरु ग्रंथ साहिब’ मध्ये समाविष्ट झाल्या आहेत. महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा रुजविण्यात आणि ती व्यापक करण्यामध्येही संत नामदेव महाराजांचे मोठे योगदान असल्याचे सौ. सावंत यांनी सांगितले.
“संत नामदेव महाराजांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांमधून आपल्याला जगण्याचे बळ, भक्तीची दिशा आणि समाजाला एकत्र घेऊन जाण्याची प्रेरणा मिळते,” असेही सौ. स्वाती निलेश सावंत यांनी सांगितले.
या सोहळ्यास श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गजानन चुंबळकर, उपाध्यक्ष रतन बोधे, खजिनदार निलेश कोपर्डे, सहखजिनदार विजय बारटक्के, सचिव आनंद विनके, जेष्ठ कार्यकर्ते निवृत्ती कोपर्डे, ॲड.शिंपी, अजय कटारे, संतोष कटारे, अमित हेंद्रे, कुंडलिक चुंबळकर, संजय बारटक्के, अजित फुटाणे, संतोष गुजर, संजय धोकटे, संदिप कोळेकर, नितीन कोळेकर, कैलास पिसे यांच्यासह समाजबांधव, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पालखी नगरप्रदक्षिणा, हरिनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि काल्याच्या कीर्तनामुळे परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
सप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, नामस्मरण आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























