वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड | शहरातील प्रभाग क्रमांक ६ व ११ मध्ये बोगस मतदार नोंदणी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील कुंभार गल्ली, अण्णाभाऊ साठेनगर, भीमनगर, नेहरू चौक परिसरात बोगस पद्धतीने मतदार नोंदणी होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.
दिनांक १०/०४/२०२६ रोजी तहसीलदार व मुख्याधिकारी यांना मतदार मॅपिंग अभियानास सहकार्य करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार प्रभाग क्र. ६ मध्ये विशेष मॅपिंग कॅम्प आयोजित करावा, अशी मागणी नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केली, जेणेकरून नागरिकांना कोणताही मानसिक त्रास होणार नाही तसेच बोगस नोंदणीला आळा बसेल.
नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी प्रांत अधिकारी रेवणनाथ लबडे यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, बूथ लेवल ऑफिसर (BLO) यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित मतदार त्या ठिकाणी वास्तव्यास आहे का, याची खात्री करावी व आवश्यक पुरावे तपासून योग्य ती कारवाई करावी. या निवेदनाची प्रत निवडणूक अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.
तसेच प्रभाग क्रमांक ११ येथील सरपंच वस्ती, शेंडे वस्ती परिसरात काही व्यक्ती बोगस कागदपत्रे तयार करून नगरपालिकेच्या हद्दीत नवीन मतदार नोंदणी करत असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन नोंदणी करताना आधार कार्ड व इतर रहिवासी पुरावे स्कॅन करून, विविध अॅप्लिकेशन्सच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून, अशा बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी दौंड नगरपालिकेचे गटनेते व नगरसेवक जीवराज पवार यांनी प्रांत अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्याकडे केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























