वृत्तवेध मarathi नेटवर्क
दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये दौंड शहरातील भीमनगर येथील रहिवासी पोलिस अधिकारी गुरुनाथ गायकवाड यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्कृष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
गुरुनाथ गायकवाड यांनी पोलिस सेवेत कार्यरत असताना प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि धाडसी कार्यपद्धतीची ओळख निर्माण केली आहे. चोरी, घरफोडी, दरोडा यांसह विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध कारवायांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
हा सन्मान मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना गुरुनाथ गायकवाड यांनी या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले. “कठीण परिस्थितीतही आई-वडिलांनी मला शिक्षण दिले आणि चांगले संस्कार केले. त्यांच्या संस्कारांमुळे व आशीर्वादामुळेच आज हा सन्मान मिळवू शकलो,” असे त्यांनी सांगितले.
या गौरवाबद्दल नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी गुरुनाथ गायकवाड यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले. सत्कारप्रसंगी सावंत म्हणाल्या, “पोलिस दलातील उल्लेखनीय व शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल मानाचे पदक मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या कर्तव्यकठोर आणि निष्ठावान सेवेचा आम्हा नगरसेवकांसह संपूर्ण शहराला सार्थ अभिमान आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “आपल्या प्रामाणिक आणि धाडसी कामामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मोठी मदत झाली आहे. हा सन्मान आपल्या अतुलनीय त्यागाची आणि कर्तव्यनिष्ठेची पावती आहे. आपल्याला पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
“गुरुनाथ गायकवाड यांना मिळालेले हे पदक म्हणजे केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण पोलिस दलाच्या कार्याचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गौरव आहे. त्यांचे असेच उल्लेखनीय कार्य पुढेही सुरू राहावे,” अशी सदिच्छा नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी व्यक्त केली.
या सत्कारप्रसंगी गायकवाड परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीमनगर परिसरासह दौंड शहरातील नागरिकांनीही गुरुनाथ गायकवाड यांच्या या यशाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या उत्कृष्ट सेवा पदकामुळे दौंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















