✍️ अख्तर काझी
दौंड: एका अज्ञात व्यक्तीने आपल्याकडील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बँकेच्या एटीएम मध्ये जमा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापक महेश माने यांनी पोलिसांकडे तक्रार केली. दौंड पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि 16 जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने पाच हजार रुपये(500 रु. च्या दहा नोटा) बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये जमा केले. सकाळी बँक उघडल्यानंतर कॅश डिपॉझिट मशीन मधील बनावट नोटांच्या बॉक्समध्ये या नोटा मिळाल्या. बँक व्यवस्थापनाच्या चौकशी अंती पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सदर प्रकरणाचा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बँकेत जमा झाल्या असल्याची माहिती व्यापारी वर्गात समजल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. बनावट नोटा खपविणारी टोळी तर शहरात कार्यरत झाली नसेल ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. अज्ञात व्यक्ती ,ग्राहकांकडून पाचशे रुपयांच्या नोटा घेताना व्यापारी वर्गाला आता दक्ष राहून विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण याआधीही शहरात बनावट नोटा खपविण्याचा प्रकार उघडकीस आला होता.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























