✍️ संदिप बारटक्के
दौंड : श्रावण महिन्याचे औचित्य साधून दौंड शहरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील प्रत्येक दिवशी भगवान महादेवाला विविध देवदेवतांच्या स्वरूपात आकर्षक शृंगार करण्यात येत असल्याने मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या अनोख्या धार्मिक परंपरेमुळे परिसरातील भाविकांसाठी हे मंदिर विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
श्रावण महिन्यात दररोज महादेवाला वेगवेगळ्या देवतांचे स्वरूप देण्यात येते. यामध्ये नृसिंह सरस्वती, खंडोबा, नागचंद्रेश्वर, गणपती, मच्छिंद्रनाथ, रेणुका माता, तिरुपती बालाजी, खाटू श्याम, विठ्ठल, द्वारकाधीश श्रीनाथजी, दत्त, महाकाली, श्रीनाथ म्हसकोबा, दहीभात, अघोरी तसेच सूर्यदेव आदी विविध स्वरूपांचा समावेश आहे. प्रत्येक दिवशी साकारण्यात येणारे हे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत असून, महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.
भगवान महादेवाच्या या विशेष शृंगाराची तयारी दुपारपासूनच सुरू होते. मंदिरातील भक्त मंडळी एकत्र येऊन चंदन पावडर, उटणे, विविध सुवासिक द्रव्ये तसेच रंगांचा वापर करून महादेवाच्या पिंडीवर संबंधित देवतेचे स्वरूप साकारतात. अत्यंत कलात्मक पद्धतीने करण्यात येणाऱ्या या शृंगारासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे योगदान देतात. अनेक तासांच्या परिश्रमानंतर साकारलेले हे मनोहरी रूप पाहण्यासाठी सायंकाळी भाविक मंदिरात येतात.
दौंड शहरातील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराला पुरातन धार्मिक वारसा लाभला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची रचना पाहिल्यानंतर त्याच्या प्राचीनतेची जाणीव होते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान महादेवाची पुरातन पिंड असून, सध्या तिच्यावर पितळी मखर चढविण्यात आले आहे. मंदिराबाहेर दगडात कोरण्यात आलेली नागांची शिल्पे तसेच महादेवाच्या पिंडीसमोर उभा असलेला दगडी नंदी हे मंदिराच्या प्राचीनतेचे आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक मानले जाते.
कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून, पुरातन धार्मिक परंपरा जपत मंदिरात विविध उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दौंड गावचे पाटील तसेच विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील उत्सवाची परंपरा सुरू आहे. मंदिराची देखभाल आणि धार्मिक विधींची जबाबदारी मंदिराचे पुजारी निखिल गुरव हे पाहत आहेत.
श्रावणातील प्रत्येक दिवशी सायंकाळी श्री सिद्धेश्वर महादेवाची विधिवत महाआरती करण्यात येते. महाआरतीच्या वेळी मंदिर परिसरात हर हर महादेव चा जयघोष घुमतो. घंटानाद, आरती आणि भक्तांच्या जयघोषामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जातो.
श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने दौंड शहरासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. दररोज साकारण्यात येणारी महादेवाची विविध रूपे, पुरातन मंदिराची धार्मिक परंपरा आणि भक्तिमय वातावरण यामुळे श्रावण महिन्यात श्री सिद्धेश्वर मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















