✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य हनुमान मंदिरात श्री चैतन्य हनुमान, श्री दत्त महाराज, जरीआईमाता, मरीआईमाता व श्री वेताळ महाराज यांच्या मूर्तींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी भक्तिभावात होणार आहे. याबाबतची माहिती पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष तथा दौंड गावचे पाटील वीरधवल जगदाळे व माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी दिली.
लोकसहभाग व लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून, सुसज्ज सभामंडप, संरक्षक भिंत, कुस्ती आखाडा, बैठक व्यवस्था, पेव्हर ब्लॉक व बाग आदी विकासकामे पूर्ण झाली आहेत. या कामासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध झाला असून, वीरधवल जगदाळे यांनी पाठपुरावा केला होता.
रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पुनःप्रतिष्ठापना महापूजा व धार्मिक विधी होणार असून, सायंकाळी ५ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दौंड शहर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























