वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याच्या रागातून एका पित्याने स्वतःच्या ९ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दौंड पोलीस स्टेशनमध्ये गु.रजि. नं. 282/2026 अन्वये बी.एन.एस. 2023 चे कलम 103(1), 238, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी पोलीस शिपाई निलेश आत्माराम फडणीस (वय 36) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी म्हणून शांताराम दुर्योधन चव्हाण आणि चिंगु शिंदबाद भोसले, दोघे रा. हनुमान वस्ती, काळे वस्तीजवळ, देऊळगाव राजे, ता. दौंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपी शांताराम चव्हाण याने त्याची मुलगी अनामिका शांताराम चव्हाण (वय ९) हिने तिचा भाऊ संस्कार याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग मनात धरला. त्यानंतर आरोपीने लाकडे कापण्याच्या मशीनच्या सहाय्याने मुलीच्या गळ्यावर, डोक्यावर व गालावर वार करून तिची हत्या केली.
इतकेच नव्हे तर, हत्या केल्यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घर पेटवून देत मृतदेह अर्धवट जाळल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच आरोपीसोबत असलेल्या चिंगु शिंदबाद भोसले हिनेही ही घटना कोणालाही सांगू नये असे सांगून माहिती पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले करीत आहेत, तर गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांनी केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























