वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
जलसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारी पाऊल टाकत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन रविवार, (ता.२२) सकाळी ८ ते ११ या वेळेत परम श्रद्धेय सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली देशभर एकाच वेळी करण्यात आले होते.
या उपक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह विविध तलाव परिसर अशा एकूण ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. दौंड शहरातील स्मशानभूमी परिसर व भीमा नदी काठ परीसर येथे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान पार पडले.
मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम एकाच वेळी राबविण्यात आला. पाणी हे केवळ संसाधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे. त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, ही जनजागृती समाजात निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह यांच्या प्रेरणादायी शिकवणीवर आधारित राहून सन २०२३ मध्ये भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एकदिवसीय मोहीम न राहता तो जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारला जावा, हा या मागील व्यापक दृष्टिकोन आहे. स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडविण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
सदगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त रूप ठरत असून समाजाला निसर्ग, मानवता आणि अध्यात्माशी जोडण्याचे कार्य करत आहे.
स्वच्छता अभियानानंतर त्याच ठिकाणी विशाल सत्संगाचे आयोजन करण्यात आले. बाह्य स्वच्छतेबरोबरच मनाच्या आंतरिक शुद्धीचाही संदेश यावेळी देण्यात आला. दौंड ब्रांचचे मुखी शिवाजी होले यांनी उपस्थित सर्व सेवादारांचे आभार मानले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























