संदिप बारटक्के
यवत : दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथे एका 24 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 108 व 3(5) अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी पुजा हनुमंत माने (वय 50, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी पायल विशाल जाधव (वय 24, रा. पिंपळगाव, ता. दौंड) हिला सन 2023 पासून पती विशाल बबन जाधव तसेच मावस सासू बानुबाई मनोहर जाधव आणि मावस सासरे मनोहर जाधव (पूर्ण नाव अज्ञात) यांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास दिला.
या सततच्या छळामुळे पायल हिचे जीवन असह्य झाल्याने तिने 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी पिंपळगाव येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई भोसले करीत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















