वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड नगरपरिषदेच्या हद्दीत पथदिवे दुरुस्ती (मेंटेनन्स) कामकाजात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत नगरसेवक रुपेश राजेश जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.
सदर अर्जात नमूद केल्याप्रमाणे, पथदिवे दुरुस्तीचे वार्षिक ठेका बी.ए.सी. इन्फ्राटेक प्रा. लि. व विन्सी ग्लोबल प्रा. लि. या एजन्सींना देण्यात आला आहे. मात्र, या एजन्सी स्थानिक नसल्याने नागरिक व लोकप्रतिनिधींनी वारंवार संपर्क साधूनही दुरुस्तीबाबत टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दौंड शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे महिनोन्महिने बंद अवस्थेत असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मागील ठेकेदाराच्या तुलनेत लाखो रुपयांचे अधिक बिल अदा करूनही समाधानकारक सेवा मिळत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नगरसेवक रुपेश जाधव यांनी पुढे म्हटले आहे की, संबंधित एजन्सींनी करारातील अटी व शर्तींचा वारंवार भंग केला असून, त्यामुळे त्यांच्या मेंटेनन्सचे बिल थांबवण्यात यावे. तसेच सदर करार तात्काळ रद्द करून संबंधित एजन्सींना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीची प्रत जिल्हाधिकारी, पुणे यांनाही पाठवण्यात आली असून, आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावर यापूर्वी दि. २३ मार्च २०२६ रोजी नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनीही प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र, दोन वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे आता दौंड नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, “दोन-दोन नगरसेवकांनी मागणी करूनही प्रशासन जागे होत नसेल, तर ही नगरसेवकांची थट्टा आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























