वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट करून धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी एका व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत दौंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मार्च २०२६ रोजी जब्बार इस्माईल शेख (वय ६२, रा. गांधी चौक, दौंड, जि. पुणे) यांनी त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त स्वरूपाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. सदर व्हिडिओमुळे दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर दौंड पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन पंचांच्या समक्ष त्यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या प्रकरणी जब्बार इस्माईल शेख यांच्यावर कलम १२९ बीएनएनएस (१०८ भादंवि) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
यानंतर त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बारामती येथील विशेष न्यायदंडाधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जब्बार इस्माईल शेख यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांना पुढील कारवाईसाठी येरवडा कारागृह, पुणे येथे रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, मोबाईलवर व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा सोशल मीडियावर कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा धार्मिक भावना दुखावतील असे आक्षेपार्ह व्हिडिओ, पोस्ट अथवा संदेश प्रसारित करू नयेत. अशा प्रकारचे कृत्य केल्यास संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























