✍️ अख्तर काझी
दौंड : नगरपालिकेमधील सर्वच विभागातील अधिकारी शहरातील विविध विकास कामांबाबत नागरिकांसह नगरसेवकांना सुद्धा सहकार्य करीत नाहीत, अधिकारी वर्गाच्या या मनमानी कारभाराविरोधात नगरपालिकेतील नागरिक हित संरक्षण मंडळ, भा.ज.पा., आर.पी.आय., पी.आर.पी.विकास आघाडीचे गटनेते योगेश कटारिया यांच्या नेतृत्वाखाली गटातील नगरसेवकांनी मुख्याधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करून नगरपालिका प्रशासना विरोधात निषेध नोंदविला.
शहरातील मोकाट व बेवारस कुत्रे पकडणे, मोकाट जनावरे पकडण्याबाबतची निविदा रद्द केलेला विषय येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये घेणे, नगरपालिका हद्दीतील रस्त्यांवर गतिरोधक बसविणे, पाणीपुरवठा विभागात कामगारांची संख्या वाढविणे, विद्युत विभागात लागणारे साहित्य उपलब्ध करून शहरातील प्रलंबित कामे पूर्ण करणे, शहरातील वारंवार बंद पडणारे पथदिवे चालू करणे, बंदिस्त चेंबर स्वच्छ करणे, शहरातील विकास कामे चालू असताना त्या ठिकाणी संबंधित अधिकारी- कर्मचारी यांनी उपस्थित राहणे, शहरातील विविध प्रभागात मागणीप्रमाणे बेंचेस देणे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आल्याचे योगेश कटारिया यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनावेळी नगरसेवक वसीम शेख ,शहानवाज पठाण, सागर जगताप ,बोरकर, अथर्व सरणोत, अमोल काळे, पवार तसेच आरपीआयचे पदाधिकारी सतीश थोरात ,माजी उपनगराध्यक्ष अनिल सोनवणे, माजी नगरसेवक राजेश गायकवाड, रुपेश कटारिया, अजय राऊत ,विशाल माशाळकर, गुड्डू थोरात, अक्षय वाघमारे आदि उपस्थित होते.
नगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुखांना सदर नमूद कामांचे लेखी आदेश काढून सदर कामे लवकरात लवकर मार्गी लावणे कामी आदेश देण्यात येतील असे लेखी पत्र मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी आंदोलकांना दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























