✍️ अख्तर काझी
दौंड : दौंड तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा (ग्रामीण) सन २०२६-२७ उत्साहपूर्ण वातावरणाiत पार पडल्या. दिनांक ११ व १२ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. शीतल जानवे, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ यांच्या हस्ते झाले. यावेळी
अशोक बोंद्रे, सुनील सरोदे, महेश मते हे समादेशक सहाय्यक तसेच जालिंदर आवारी, अध्यक्ष पुणे जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघ, मुकुंद भिसे, सुनील माने, दुर्योधन जठार, राजेंद्र साळवे, सचिन जाधव, विजय कांबळे, समीर मगर, प्रीतम पवार व जितेंश परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्योधन जठार यांनी केले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE, दौंडने प्रथम, मेरी मेमोरियल स्कूल स्टेट बोर्ड, दौंडने द्वितीय, तर श्रीमंगेश मेमोरियल इंटरनॅशनल प्रायमरी स्कूल, दौंडने तृतीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दौंड प्रथम, श्री. समाजसेवक शिवाजीराव जेधे हायस्कूल, केडगाव द्वितीय, तर श्रीमंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल, दौंड तृतीय ठरले.
१९ वर्षांखालील मुलांच्या गटात सेंट सॅबेस्टियन हायस्कूल, दौंडने प्रथम, शेठ ज्योती प्रसाद विद्यालय, दौंडने द्वितीय, तर मेरी मेमोरियल हायस्कूल, दौंडने तृतीय क्रमांक पटकावला.
मुलींच्या गटातही विविध शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १४ वर्षांखालील मुलींमध्ये सेंट सॅबेस्टियन हायस्कूल, दौंड प्रथम, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दौंड द्वितीय, तर दीपगृह अकॅडमी, देऊळगाव गाडा तृतीय ठरले. १७ वर्षांखालील मुलींमध्ये शिवाव्हॅली स्कूल, देऊळगाव गाडा प्रथम, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दौंड द्वितीय, तर संस्कार प्रायमरी अँड हायस्कूल, दौंडने तृतीय क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील मुलींमध्ये सेंट सॅबेस्टियन हायस्कूल, दौंड प्रथम, तर मेरी मेमोरियल स्कूल, दौंड द्वितीय क्रमांकावर राहिले.
बक्षीस वितरण समारंभास सुनील सरोदे, सहाय्यक समादेशक, गट क्रमांक ५ आणि रमण बनकर, पीआय, गट क्रमांक ५ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांनी खेळाडू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करण्याचे आवाहन केले.
यावेळी जालिंदर आवारी, अध्यक्ष पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जितेश परदेशी, महाराष्ट्र पोलीस फुटबॉल टीम प्रशिक्षक, समीर मगर, प्रीतम पवार, स्वर जाधव, प्रतीक बारस्कर, मुस्तफा शेख, विजय कांबळे व मोहम्मद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
दौंड फुटबॉल अकादमीचा फुटबॉल खेळाडू स्वर्गीय राधा रमण अडसूळ यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने विजयी व उपविजयी संघांना विशेष पारितोषिके प्रदान करण्यात आली. या उपक्रमातून खेळाडूच्या स्मृतींना अनोखी मानवंदना देण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, पंच, क्रीडा शिक्षक, स्वयंसेवक तसेच सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. फारुख शेख यांनी दौंड तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















