वृत्तवेध मarathi/ संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका नगरसेवकाने नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी ‘आपल्या समस्या आमची जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जनता दरबाराचे आयोजन केले होते. दौंड शहरातील प्रभाग क्रमांक अकरा मधील नागरिकांसाठी हा उपक्रम शुक्रवारी (दि.१३) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत राजमाता जिजाऊ माँसाहेब ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, सरपंच वस्ती येथे आयोजित करण्यात आला होता.
या जनता दरबाराचे आयोजन गटनेते तथा नगरसेवक जिवराज पवार व नगरसेविका उज्वला मनीष परकाळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या उपक्रमात प्रभागातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, गटार व्यवस्था तसेच इतर नागरी समस्यांबाबत आपली मते व अडचणी मांडल्या.
यावेळी नगरसेवक जिवराज पवार आणि नगरसेविका उज्वला परकाळे यांनी नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या व संबंधित विभागाशी संपर्क साधून काही समस्यांवर तात्काळ उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असा थेट संवादाचा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक जिवराज पवार व नगरसेविका उज्वला परकाळे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























