वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त दौंड शहरामध्ये संपूर्ण फाल्गुन महिना धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो.
क्रूरकर्मा मुघल शासक औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना पकडल्यानंतर महिनाभर त्यांचा प्रचंड छळ करून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली. देव – देश आणि धर्मासाठी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी बलिदान दिले. त्यांची आठवण म्हणून हिंदू बांधवांकडून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण महिना धर्मवीर बलिदान मास पाळला जातो.
या संपूर्ण महिन्यात दौंड शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये दररोज महिनाभर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात येते. तसेच हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींच्या निधनाचे सुतक संपूर्ण हिंदू समाजाला लागू असल्याच्या श्रद्धेतून महिनाभर चप्पल न घालणे, गोड न खाणे, मुंडण करणे, मांसाहार वर्ज्य करणे, गादी न वापरणे, आनंदाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे, आनंदाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे असे व्रत पाळले जाते.
दौंड शहरातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने धर्मवीर बलिदान मास पाळला जात असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना दररोज दौंड मधील सर्व शाळेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी (यंदा १९ मार्च) मुकपदयात्रेने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करून धर्मवीर बलिदान मासाची सांगता होणार आहे.
दौंड मध्ये दररोज सकाळी १०:३० व रात्री सात वाजता सामूहिकपणे सर्व शाळा व शिवप्रेमींच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते. काल ब्लॉसम स्कूल व आज संस्कार स्कूल यांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. तरी शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, युवती महिला व शिवप्रेमींनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.आणि दररोज अभिवादन सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन दत्ताजी शिणोलीकर, रवी जाधव, निखिल स्वामी, सिद्धेश कदम व शैलेश जठार यांनी केले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























