✍️ अख्तर काझी
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ने मोठी कारवाई करत विषारी दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे तब्बल ३,४२० किलो क्लोरल हायड्रेट (Chloral Hydrate) आणि ते तयार करण्यासाठी लागणारे ५,८०० लिटर रॉ केमिकल जप्त केले आहे. या कारवाईत चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, अवैध रासायनिक उत्पादनाचा मोठा साठा उघडकीस आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या कोल्हापूर कृती विभागाला समर्थ लॅबोरेटरीज, एमआयडीसी, कुरकुंभ येथे एनडीपीएस गुन्ह्यातील आरोपी किशोर दत्तात्रय सुर्वे यांच्या कारखान्यात शैलेश विठ्ठल ठाकूर हा चोरट्या पद्धतीने एमडी (मेफेड्रॉन) ड्रग तयार करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची सुमारे दीड महिना गुप्त पडताळणी केल्यानंतर २९ जून २०२६ रोजी छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी फिकट पिवळसर-पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा ३,४२० किलो संशयित पदार्थ, त्याच्या निर्मितीसाठी लागणारे ५,८०० लिटर रॉ केमिकल, तसेच एमडी/मेफेड्रॉन उत्पादनासाठी वापरली जाणारी सेंट्रीफ्यूगल मशीन आणि जीएलआर (GLR) मशीन जप्त केली. प्राथमिक माहितीनुसार या यंत्रसामग्रीची किंमत अंदाजे एक कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२), शैलेश विठ्ठल ठाकूर (वय ५५), नबी सरवर जमीर सिद्दीकी (वय ४०) आणि आदेश विठ्ठल पाचांगणे (वय ५८) हे कारखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित कारखाना हा किशोर सुर्वे यांच्या मालकीचा असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. जप्त करण्यात आलेले रसायन शैलेश ठाकूर याने तयार केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
जप्त केलेल्या पदार्थाचे न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे येथे परीक्षण करण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तो प्रतिबंधित क्लोरल हायड्रेट (Chloral Hydrate) असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणेनुसार या रसायनाचा वापर विषारी दारू तयार करण्यासाठी केला जातो आणि जप्त केलेल्या ३,४२० किलो क्लोरल हायड्रेटपासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारू तयार होऊ शकते.
प्राथमिक चौकशीत संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही समोर आले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, महाराष्ट्र यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर कृती विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने यशस्वीरीत्या पार पाडली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























