वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दूध भेसळीचा गंभीर प्रश्न विधानसभेत सातत्याने मांडणारे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, राज्यातील सर्वात मोठ्या दूध भेसळ रॅकेटपैकी एकावर प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेत १३ जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आमदार राहुल कुल यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील बहुतांश दूध संकलन केंद्रांवर तपासणी सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. दुधाच्या गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र तपासणी यंत्रणा उभारणे, भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.
या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने दूध भेसळविरोधी विशेष मोहीम जाहीर केली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुणे ग्रामीण पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाने मोठी संयुक्त कारवाई करत राज्यातील भेसळखोरांच्या जाळ्यावर घाव घातला.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि अन्न-औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर, सिल्लोड, अकलूज, अहिल्यानगर आणि सांगली परिसरात एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. तपासादरम्यान मंचर हे या रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे समोर आले असून, गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कृत्रिम दूध तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती उघड झाली आहे.
या कारवाईत कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायने, यंत्रसामग्री, वाहने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून, आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दूध भेसळीसारख्या जनतेच्या आरोग्याशी निगडित गंभीर विषयावर आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत सातत्याने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























