वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : “विद्यार्थ्यांनी ज्ञानवृद्धीसाठी पुस्तक वाचनाची सवय जोपासली पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाशिवाय व्यक्तीची सर्वांगीण प्रगती होऊ शकत नाही,” असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) जी. ए. देशपांडे यांनी केले.
दिवाणी व फौजदारी न्यायालय, दौंड आणि भीमथडी शिक्षण संस्थेचे स्व. कि. गु. कटारिया महाविद्यालय, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ मार्च २०२६ रोजी आयोजित “कायदेविषयक माहिती शिबिरात” ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाचा अतिरेक टाळून अभ्यास आणि सकारात्मक उपक्रमांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. तसेच सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
दौंड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पोपट फुलारी यांनी ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी (OTP) फसवणूक यांसारख्या वाढत्या सायबर गुन्ह्यांविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले. डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या विशेष माहिती शिबिराचे यशस्वी नियोजन भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुखजी कटारिया व संस्थेचे चेअरमन विक्रमशेठ कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र, महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननावरे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रशांत गिरमकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. निलेश साखरे व प्रा. कैलास वराळे यांनी केले, तर आभार प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र यांनी मानले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























