वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहरामध्ये महावितरणकडून ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तुषार कोळी यांनी ग्राहक तक्रार निवारण मंच बारामती येथे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसोबत संबंधित पुरावेही सादर करण्यात आले असून, मंचाचा अंतिम निर्णय होईपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याच्या कारवाईला पूर्णपणे स्थगिती (Stay) देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ग्राहकांची पूर्वसंमती न घेता मीटर बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, ५ जुलै रोजी टीव्ही ९ मराठीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार स्मार्ट मीटरमध्ये काही तांत्रिक त्रुटी समोर आल्याचा उल्लेख करत, या पार्श्वभूमीवर कोणत्याही ग्राहकावर सक्ती केली जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
याशिवाय त्यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. नवीन स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी त्यांची शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत (Lab Testing) तपासणी करण्यात यावी आणि या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान स्वतःची बाजू मांडण्यासाठी वैयक्तिक सुनावणीची संधी देण्यात यावी.
यावेळी बोलताना तुषार कोळी म्हणाले, “शेजारच्या अहिल्यानगर जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याची कोणतीही सक्ती नसल्याचे तेथील अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी जाहीर केले आहे. मग दौंडमध्येच ग्राहकांवर आर्थिक भार टाकणाऱ्या स्मार्ट मीटरची जबरदस्ती का केली जात आहे?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून राज्यभरात विविध ठिकाणी चर्चा सुरू असताना, दौंडमधील हे प्रकरण आता ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या निर्णयाकडे लागले आहे. मंचाच्या निर्णयानंतरच पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























