✍️संदिप बारटक्के
दौंड : देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत रामराज्य प्रतिष्ठान, दौंड यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी फराळ वाटपाचा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी उपस्थित राहून भाविकांना फराळाचे वाटप केले तसेच आषाढी एकादशीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगितले.
यावेळी बोलताना नगरसेविका स्वाती सावंत म्हणाल्या, आज आषाढ शुद्ध एकादशी अर्थात देवशयनी आषाढी एकादशी हा अत्यंत पवित्र दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांचा गजर करत पायी पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. विठ्ठल हा केवळ देव नसून समानता, प्रेम, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा महाराष्ट्राचा मायबाप आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, आजपासून चातुर्मासाला प्रारंभ होत असून हा काळ आत्मपरीक्षण, सात्त्विक आचरण, उपवास आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया की सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो.पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय!
कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत फराळाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने व हरि नामाचा गजराने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रेम जमदाडे, बब्बू जमदाडे, अक्षय घोलप, चेतक कटारे, विकी जाधव, यश कटारे, दत्ता राऊत, विकी घोडके आणि अक्षय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
उपस्थितांनी आयोजकांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























