✍️- संदिप बारटक्के
दौंड : भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव तथा माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त बी. ई. सोसायटी इंग्लिश मीडियम प्राथमिक शाळेत विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन उत्साहात करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, शटल रन, रिंग पास गेम, रांगोळी स्पर्धा तसेच वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठी देखील विविध मनोरंजक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना नगरसेविका रितिका कटारिया, नगरसेविका वैशाली मासळकर, गोविंद अग्रवाल, मुख्याध्यापक नवनाथ कदम व मुख्याध्यापिका शुभांगी काकडे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी शाळेतील लहान मुलींनी सुंदर वाढदिवस नृत्य सादर करून प्रेमसुखजी कटारिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मनमोहक नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी प्रेमसुख कटारिया यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळाला पाहिजे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही प्रगती करून अनेक पारितोषिके मिळवली पाहिजेत.”
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष सोनवणे (क्रीडा शिक्षक) यांनी या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















