✍️संदिप बारटक्के
दौंड : गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भारतीय संस्कृतीतील वृक्षपूजनाची परंपरा जपण्याच्या उद्देशाने दौंड शहरातील वरद विनायक सोसायटीमध्ये ‘ऋषीवन वृक्ष अभियान २०२६’ अंतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. ‘एक कुटुंब – एक वृक्ष – एक संकल्प’ हा संदेश देत नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.
सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल १२ फूट उंचीची करंज वृक्षांची ११ रोपे सोसायटी परिसरात लावण्यात आली. मोठ्या आकाराची आणि विकसित रोपे लावण्यात आल्याने परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास तसेच भविष्यात सावली व पर्यावरणीय लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
करंज वृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. करंजामुळे मातीची सुपीकता वाढण्यास मदत होते, तसेच विविध जीव-जंतू व पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. करंजाला औषधी गुणधर्म असून त्याचा पारंपरिक उपयोगही केला जातो. वृक्षांच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच परिसरातील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
गणेशोत्सवासारख्या सणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून करण्यात आला. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन दौंड नगरपरिषदेचे गटनेते तथा नगरसेवक जीवराज पवार, प्रल्हाद जाधव मित्र परिवार, दौंड मेडिकल असोसिएशन आणि योगेश्वरी फाउंडेशन, दौंड यांच्या संयुक्त पुढाकारातून करण्यात आले. या उपक्रमामुळे वरद विनायक सोसायटी परिसरात पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होण्यास हातभार लागणार असून, ‘एक कुटुंब – एक वृक्ष – एक संकल्प’ या संकल्पनेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमास दौंड मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष नीता गिदवानी, डॉ. भंगाळे, डॉ.क्षितिजा कुलकर्णी, डॉ. भारती गिदवानी, योगेश्वरी फाऊंडेशन दौंडचे पदाधिकारी, दीपक ठाकूर, रोहन दुबे तसेच वरद विनायक सोसायटीतील योगेश पवार, विजय भोसले, मकरंद पवार आणि सागर खरात, संपत नरुटे, तुकाराम भोसले,छगन क्षीरसागर, अनिल सरडे, दत्तात्रेय दामगुडे यांची उपस्थिती होती.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















