वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, मर्यादित साधनसामग्री आणि कोणत्याही खासगी अकॅडमीचे प्रशिक्षण नसतानाही जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमांच्या बळावर दौंड शहरातील चार युवकांनी पोलीस दलात भरती होऊन यशाचे शिखर गाठले आहे. आकाश व्हन्ने, स्वप्निल लोडी, प्रदीप साळुंके आणि स्वप्निल गायकवाड या चारही युवकांच्या यशामुळे दौंड शहराचा गौरव वाढला असून त्यांच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आकाश अमृत व्हन्ने याची दुसऱ्या प्रयत्नात रायगड जिल्हा पोलीस दलात निवड झाली. त्याचे वडील टेलरिंग दुकानात शिवणकाम करतात, तर आई घरकाम करून कुटुंबाला हातभार लावते. स्वप्निल निर्मला आनंद लोडी याची तिसऱ्या प्रयत्नात मुंबई शहर पोलीस दलात निवड झाली. त्याचे वडील हातकाम करून उदरनिर्वाह करतात, तर आई घरकाम करते.
आकाश व्हन्ने आणि स्वप्निल लोडी हे दोघेही बेसबॉल खेळातील शालेय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून त्यांना क्रीडा कोट्यातून पोलीस दलात संधी मिळाली आहे. खेळातील सातत्य, शिस्त आणि मेहनतीचा त्यांना मोठा फायदा झाला.
प्रदीप सुधाकर साळुंके याची तिसऱ्या प्रयत्नात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली. त्याचे आई-वडील भाजी मंडईत भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर स्वप्निल रविंद्र गायकवाड याचीही तिसऱ्या प्रयत्नात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली असून त्याचे वडील मजुरी करतात आणि आई घरकाम करून संसाराचा गाडा हाकते.
विशेष म्हणजे हे चारही युवक शेठ जोतीप्रसाद विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा सत्कार भीमथडी शिक्षण संस्थेचे सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कष्ट, जिद्द आणि संघर्षाचे कौतुक करत पुढील सेवाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या या युवकांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश हे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या यशामुळे दौंड शहरात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























