वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात पत्रकार विजय जाधव यांना ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
न्यू महाराष्ट्र पँथर सेनेचे अध्यक्ष जयदीप माणिक बगाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमांची सुरुवात ११ एप्रिल रोजी महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या सन्मान सोहळ्याने झाली. १२ एप्रिल रोजी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकार, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
दौंड शहरातील पत्रकार विजय जाधव यांनी डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडत प्रशासना पर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत न्यू महाराष्ट्र पँथर सेनेने त्यांना सन्मानित केले.
१४ एप्रिल रोजी अन्नदानाचा उपक्रम राबवून गरजू नागरिकांना मदत करण्यात आली, तसेच २५० नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पुस्तके मोफत वितरित करण्यात आली. दौंड नगर परिषदेच्या वाचनालयासाठी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना पुस्तकांचा संच भेट देत वाचनालय नियमित सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला जेष्ठ नेते महेश भागवत, उपनगराध्यक्षा छाया थोरात,नगरसेवक योगेश कटारिया, नगरसेवक रोहित पाटील, नगरसेवक जिवराज पवार, कुंदा बगाडे, उत्तम सोनवणे, प्रदीप बगाडे, निता वाघमारे, सुनिता वंटे यांसह अनेक मान्यवर आणि पंचक्रोशीतील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत थोरात यांनी मानले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























