वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : दौंड–पाटस रोडवरील हॉटेल जगदंबा येथे बुधवारी (ता.०७) गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला होता. या दुर्घटनेत तब्बल १० कामगार गंभीर जखमी झाले असून त्यातील काही कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास दौंड पोलीस करत असून, दैनिक वर्तमानपत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल मालक व व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा अपघात घरगुती गॅस सिलेंडरच्या टाकीमुळे झालेला असून, याला बेकायदेशीररित्या गॅस पुरवठा करणारी एजन्सी व संबंधित व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे दौंड शहरप्रमुख आनंद पळसे यांनी केला आहे.
या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरप्रमुख आनंद पळसे यांनी दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांना निवेदन देत, हॉटेल मालकांऐवजी बेकायदेशीर गॅस पुरवठा करणारी एजन्सी व दौंड परिसरात अवैधरित्या गॅस पुरवठा करणाऱ्या व्यक्तींवर कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर गॅस पुरवठ्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनावर विक्रम इंगोले, नितीन सलामपुरे, निलेश झोजे, नामदेव राहिंज, चेतन लवांडे, निखिल पळसे, बालाजी कोळी, तोफीक सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















