वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : शहरात श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने शहरातून भगवान श्रीरामांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यामुळे संपूर्ण दौंड शहर रामनामाच्या गजराने दुमदुमून गेले.
श्री राम नवमी निमित्त सकाळपासूनच पाटील चौकातील केंडे वाड्यातील श्रीराम मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, आरती व भजन कार्यक्रम पार पडले.
दुपारच्या सुमारास श्रीराम जन्माचा सोहळा अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. सायंकाळी पाटील चौकातील श्रीराम मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली. या शोभायात्रेत नरसिंह अवतार व हनुमान यांचे जिवंत देखावे विशेष आकर्षण ठरले. सुंदर सजवलेल्या रथावर भगवान श्रीरामांची मूर्ती विराजमान करण्यात आली होती, तर दुसऱ्या रथात महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
या शोभायात्रेची सुरुवात नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्षा छाया थोरात, नगरसेविका स्वाती सावंत, प्रणीती शिंदे-जठार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीरामांची महाआरती करण्यात आली.
शोभायात्रेत वीरभद्र ढोल-ताशा व ध्वज पथके, शिवरक्षक लेझीम पथक, वीरशैव गवळी समाजाचे आकर्षक पथक तसेच काळभैरवनाथ हलगी पथक यांनी दमदार सादरीकरण करत नागरिकांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक-युवतींनी उत्सवात अधिक रंग भरला.
यात्रेदरम्यान “जय श्रीराम”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. शहरातील विविध भागांत नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करत फुलांची उधळण केली. तसेच ठिकठिकाणी पाणी व प्रसादाचे वाटप करण्यात आले. या उत्सवात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला.
पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शोभायात्रा शांततेत व शिस्तबद्धरीत्या पार पडली.
शोभायात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक प्रविण परदेशी उपस्थित होते.
शोभायात्रेनंतर कै. कैलास बोडके यांच्या स्मरणार्थ रुपेश कटारिया व शैलेश पवार यांच्या वतीने रामभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष अक्षय घोलप यांनी सर्वांचे आभार मानले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























