वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरात महावितरणकडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तुषार कोळी यांनी केला आहे. महावितरणने या पार्श्वभूमीवर ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा दडपशाही थांबवावी, तसेच घरगुती वीज ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी त्यांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तुषार कोळी यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात त्यांनी MERC वीज पुरवठा संहिता २०२१ मधील नियम १५ तसेच वीज कायदा २००३ च्या कलम ५५चा उल्लेख करत, सध्याचा मीटर अचूक व सुस्थितीत असेल तर ग्राहकाच्या संमतीशिवाय तो बदलता येत नसल्याचा दावा केला आहे. तसेच मीटर बदलण्यापूर्वी अधिकृत चाचणी करून तो सदोष असल्याचा लेखी अहवाल देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, राज्य शासनाच्या धोरणानुसार घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले असतानाही, कंत्राटदारांकडून पूर्वसूचना व संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध मीटर बदलल्यास ग्राहक हक्कांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी ग्राहक तक्रार निवारण मंच (CGRF) तसेच ग्राहक न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला आहे.
दरम्यान, स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत शहरात विविध प्रतिक्रिया उमटत असून, वाढत्या वीजबिलांच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. महावितरण प्रशासन या निवेदनावर काय भूमिका घेते, याकडे आता दौंडकरांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















