वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड — शहरातील नागरिकांच्या सुविधा वाढाव्यात तसेच शहराच्या वैभवात भर पडावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी केलेल्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
मौजे दौंड येथील गायरान जमिनीपैकी गट नं. २७६/१ अ मधील सुमारे ८ हजार चौरस मीटर म्हणजेच तब्बल २ एकर शासकीय जागा बगीचा व सुशोभीकरण विकसित करण्यासाठी दौंड नगरपरिषदेला देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. १३ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार, ही जागा दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना विनामूल्य (महसूलमुक्त व भोगवटा मूल्यरहित) स्वरूपात प्रदान करण्यात आली आहे. सदर जागेचा वापर केवळ सार्वजनिक प्रयोजनासाठी म्हणजेच बगीचा व सुशोभीकरणासाठीच करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे दौंड शहरात मोकळ्या जागा व उद्यानांची मोठी गरज निर्माण झाली होती. ही गरज ओळखून आमदार राहुल कुल यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता २ एकरची ही जागा उपलब्ध झाल्यामुळे येथे वृक्षारोपणासह सुंदर उद्यान व सुशोभीकरण करण्यात येणार असून, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हे एक हक्काचे विरंगुळा केंद्र ठरणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार कुल म्हणाले, “दौंड शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. दौंडच्या विकासासाठी ही जागा मंजूर केल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनःपूर्वक आभारी आहे. त्यांच्या सहकार्यामुळे दौंडच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.”
या निर्णयामुळे दौंड शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शहराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल होणार असल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























