वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंडचे युवा नेते वीरधवल बाबा जगदाळे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, त्यांचे नांव जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
दौंड तालुक्यातील खडकी- देऊळगाव गटाचे नेतृत्व करणारे जगदाळे यांना ही मोठी संधी मिळाल्याने तालुक्यात राजकीय दबदबा पुन्हा अधोरेखित झाला आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक असतानाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगदाळेंवर विश्वास दाखवत जिल्ह्याची धुरा त्यांच्या हाती सोपवली.
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत ७३ पैकी ५१ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर अनुभवी आणि जनसंपर्क मजबूत असलेल्या चेहऱ्याला पक्षाने पसंती दिली.
वीरधवल जगदाळे यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांचे वडील दिवंगत कृष्णराव जगदाळे हे दौंडचे आमदार होते, तर आई उषादेवी जगदाळे यांनीही आमदार म्हणून काम पाहिले आहे. हा समृद्ध राजकीय वारसा पुढे नेत वीरधवल यांनी जिल्हा परिषदेत सलग तीन वेळा विजय मिळवत हॅटट्रिक साधली आहे.
ग्रामीण भागातील प्रश्नांची सखोल जाण, कार्यकर्त्यांशी असलेला मजबूत संपर्क आणि अनुभवाच्या जोरावर जगदाळे यांच्या नेतृत्वाकडे आता संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























